दोडामार्ग- कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा तिलारी घाट हा सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी काल सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. जयकर पॉईंट येथे खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आणि अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
सध्या घाट बंद झाल्याने दोडामार्ग-मांगेली-तळेवाडी ते चोर्लामार्गे बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे. तसेच, दोडामार्ग-साखळी ते चोर्ला घाट मार्गे बेळगाव आणि तळकट-कुंभवडे-आंबोली मार्गेही बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे. मोर्ले ते पारगड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसला, तरी काहीजण या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, एसटी वगळता इतर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे तिलारी घाटातून सुरू होती. दरम्यान, घाटातील जयकर पॉईंट येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचला. एसटी बंद झाल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. घाटातून एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे व स्थानिक ग्रामस्थांनी विविध आंदोलन, उपोषण केले. स्थानिकांचा प्रशासनाविरोधात वाढता उद्रेक पाहता एसटी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने घाटातून एसटी उतरवून प्रात्यक्षिकही घेतले. यावेळी खचलेल्या रस्त्याची सबब एसटी महामंडळाने पुढे केली. त्यामुळे आता हे रस्ता दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.
तिलारी घाटातील वाहतूक १५ दिवस बंद राहणार !
