तिलारी घाटाच्या रस्त्यात भगदाड! वाहने चालवणे धोकादायक बनले

दोडामार्ग- अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याचा काही भाग खचण्याची घटना ताजी असताना आता याच रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे.अरुंद असलेल्या घाटाच्या वळणावरच हे भगदाड पडले आहे. त्याचा अंदाज वाहनचालकांना येऊ शकत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.त्यामुळे हे भगदाड तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.

तिलारी घाट हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांना जोडण्याचे काम करतो. या घाटातील रस्त्यांची दुरुस्ती पाच वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर झालेल्या पहिल्याच अतिवृष्टीमुळे या घाटातील तीन ठिकाणी रस्ता खचला होता. त्यानंतर घाट वाहतुकीस पूर्णतः बंद झाला होता. पावसाळा संपताच चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने खचलेल्या घाटरस्त्याची दुरुस्ती केली होती.त्यानंतर सुदैवाने या घटनांची पुनरावृत्ती झाली नव्हती.मात्र गेल्या दोन वर्षांत गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्यटक याच घाटमार्गाचा वापर करू लागल्याने याठिकाणची वाहतूक वाढली आहे. त्यातच खोलदरी असलेल्या या घाटातील रस्त्यात मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.तरी वाहनांची वर्दळ लक्षात घेता तातडीने हे भगदाड बुजविणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top