मुंबई – तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडवात जनावरांची चरबी आणि माशाचे तेल असल्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिराचा प्रसादाचा लाडू वादात सापडला आहे. या मंदिरातील प्रसादाचे लाडू उंदीर कुरतडतात आणि प्रसादाच्या लाडवाच्या ट्रे मध्ये उंदराची पिल्ले फिरतात असा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उंदरांनी पाकीट कुरतडून खाल्लेले हेच लाडू गणेशभक्तांना दिले जात असल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिराचे प्रशासन अशाप्रकारे भाविकांच्या आरोग्याशी खेळ कसा काय खेळ करू शकते, असा सवाल भाविक विचारत आहेत.
सिद्धीविनायक मंदिरात सामान्य नागरिकांपासून नामांकितांपर्यंत भक्तांची रीघ लागलेली असते. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक येथे येतात. घरी जाताना ते प्रसाद म्हणून सिद्धिविनायक मंदिरात मिळणारा प्रसादाचा लाडू आवर्जून नेतात. गणेशभक्तांसाठी तिरुपतीच्या मंदिरातील प्रसादाच्या लाडवांप्रमाणेच या लाडवांचे महात्म्य आहे. गणेशभक्त तो भक्तिभावाने खातात. हा लाडू बनवण्यासाठी शुद्ध तूप, बेसन, काजू, बेदाणे वापरले जात असल्याचे आणि स्वच्छतेचे पालन केले जात असल्याचे दोन दिवसांपूर्वी मंदिराकडून सांगण्यात आले होते. महापालिकेकडून या लाडवांची चाचणी केली जाते, असा दावाही केला होता. मात्र, हे लाडू उंदीर खात असल्याचा व्हिडिओ आल्याने गणेशभक्तांना धक्का
बसला आहे.
मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडवाच्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. उंदरांनी लाडवांची पॅकेट कुरतडून लाडू खाल्ले आहेत. प्लास्टिकचा ट्रेही कुरतडला आहे. हेच लाडू भक्तांना प्रसाद म्हणून दिले जात असल्याचा दावा आहे. सिद्धीविनायक मंदिरात उंदरांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच उंदीर थेट प्रसादावर ताव मारत आहेत. इतकी चोख व्यवस्था असलेल्या आणि पैशाची कमतरता नसलेल्या मंदिरात कोणाचे याकडे लक्ष नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.
उंदरांचे साम्राज वाढले असताना ट्रस्ट, अध्यक्ष सदा सरवणकर, मंदिर प्रशासन आणि कार्यकारी अधिकारी वीणा पाटील नेमके काय करत आहेत? कार्यकारी अधिकारी आणि विश्वस्त मंडळ यांचे ज्या लाडू विभागाकडून उत्पन्न मिळते त्याकडे दुर्लक्ष आहे का? यामध्ये नेमके दोषी कोण आहे, कार्यकारी अधिकारी की विश्वस्त मंडळ? या प्रसादामुळे भाविकांच्या
आरोग्याचे नुकसान झाले तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? अन्न आणि औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मंदिरात सर्वत्र सीसीटीव्ही लावले आहेत तेही कुणी बघत
नाही का?
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत राजकीय वक्तव्य करीत म्हटले की, सरकारने या मंदिराला 500 कोटी रुपये दिले आहेत. पुण्यातील दगडूशेठनंतर सिद्धिविनायक हेच दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. सरकारने 500 कोटीं दिले, ते काय उंदरांच्या लेंड्या वाढवायला दिले होते काय? लाडका काँट्रॅक्टर , लाडका आमदार हे बंद करून सक्षम व्यक्तीच्या हाती मुंबई दिली पाहिजे . मनसे नेते किल्लेदार यांनीही मनसेची राजकीय भूमिका मांडत म्हटले की हा न्यास सरकारने ताब्यात घ्यायला हवा. यावर राजकीय नेमणुका नको. भाजपाचे मुंगंटीवार विषयाचे गांभीर्य ओळखून म्हणाले की दोषींना शिक्षा
झालीच पाहिजे.
सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी या प्रकाराबाबत म्हटले की, हा व्हिडिओ सिद्धीविनायक मंदिराचा नाही असा आमचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हे सर्व तपासायला हवे. या आरोपांमध्ये तथ्य आहे अथवा नाही याची चौकशी करू.