तिरुमला -तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू वाटप केंद्रात आज दुपारी अचानक आग लागली. यामुळे मंदिरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. गर्दी कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.यासंदर्भात देवस्थानम बोर्डाचे अधिकारी वेंकैया चोधरी यांनी म्हटले आहे की, तिरुपती मंदिराच्या लाडू वाटप केंद्राच्या ४७ व्या क्रमांकाच्या काऊंटर वरील संगणकाला जोडलेल्या यूपीएस सिस्टममध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर तिथे आग लागून ती पसरली. यानंतर ताबडतोब अग्निशमन कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या तिरुपतीमध्ये १० दिवसांचा वैकुंठ द्वार दर्शनम उत्सव सुरु आहे. हजारो भाविक त्यासाठी तिरुपती येथे आलेले आहेत. कालचपेक्षा आजची गर्दी कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याआधी ८ जानेवारीला मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ जणांचा मृत्यू झाला होता.
तिरुपतीच्या लाडूवाटप केंद्रात आग
