तिरुमला – तिरुपतीच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात चरबी मिसळण्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता या लाडूमध्ये चक्क एका कागदात गुंडाळलेले तंबाखू सापडली आहे. देवस्थानने हा प्रसाद पवित्र असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर सापडलेल्या या पुडीने मंदिराच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.कम्मन जिल्ह्यातील धोंतू पद्मावती या १९ सप्टेंबरला तिरुपती येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लाडवाचा प्रसाद आणला होता. या प्रसादातील एक लाडू त्यांनी फोडून पाहिला असता त्यांना या लाडवात एका कागदाच्या पुडीत तंबाखू आढळला. या बाबत त्या म्हणाल्या की, प्रसादात हा तंबाखू आढळून आल्यामुळे मला धक्काच बसला. प्रसाद हा पवित्र असायला हवा, या अशा गोष्टी प्रसादात आढळल्याने प्रसादाविषयीच अविश्वास निर्माण झाला आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कारकिर्दीत तिरुपतीच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात जनावरांची चरबी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता त्यांच्या कारकिर्दीत तंबाखुच आढळल्याने या लाडवांविषयी भाविकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.
तिरुपतीच्या लाडवात तंबाखुची पुडी
