पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रसायन रिसायकलिंग करणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला.काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले तर एक कामगार किरकोळ जखमी झाला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर जी. ४४ मध्ये धार्मित रिसायकलिंग इंडस्ट्रीज ही कंपनी आहे.या कंपनीत काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झिंक फॉस्फेट आणि कॉपर फॉस्फेट यांचे मिश्रण सुरू असताना स्फोट झाला.या स्फोटात सहापैकी तीन कामगार गंभीर जखमी झाले.तर एकजण किरकोळ जखमी झाला.जखमींवर तुंगा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तिघा जखमींची नावे बलराम वर्मा, रामप्रकाश वर्मा आणि अंकित वर्मा अशी आहेत.या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या आगीवर शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण आणले.