मुंबई :
पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. अर्ध्या तासात तांत्रिक समस्या दूर करण्यात आली. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत सुरु करण्यात आली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यासोबत वसई, विरार आणि पालघर भागात पाऊस पडत असल्यामुळे लोकल धीम्या गतीने धावत होती. परिणामी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा खोळंबा झाला.