रायगड – जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कोणथरे गावाने आपल्या गावातील विधवा स्त्रियांच्या बाबतीत एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक सामाजिक, धाडसी निर्णय घेतला आहे. या स्त्रियांना जाचक सामाजिक बंधने व रुढीतून मुक्त करण्याचा ठराव नुकताच एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
या गावातील श्री काळभैरव उत्सवानिमित्त ग्रामविकास मंडळ कोणथरे, मुंबईकर मंडळ कोणथरे, ग्रामस्थ मंडळ कोणथरे व महिला मंडळ कोणथरे यांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच काळभैरव मंदिर सभागृहात संपन्न झाली. यावेळी विधवांचे स्थान सौभाग्यवतींप्रमाणे संपन्न असावे आणि खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता जोपासली जावी यासाठी विधवा प्रथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले गैरसमज, जाचक रूढी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
याप्रसंगी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष लिलाधर बाईत, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाईत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष किसन बाईत व महिला मंडळाच्या अध्यक्षा हर्षाली आडीत तसेच गावातील ज्येेष्ठ सभासद साधुराम पिंपळे, चंद्रकांत कोतवाल उपस्थित होते.