नांदेड- बीएसआर पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर (केसीआर) यांनी नांदेडच्या लोहा येथे आज जाहीर सभा घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देताना के.चंद्रशेखर म्हणाले की, ‘तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू करा आणि दलितबंधू योजना अंमलात आणा, मग माझे महाराष्ट्रात काम राहणार नाही. मी महाराष्ट्रात येणे बंद करीन. त्यांनी जर ही कामे केली नाही तर मी वारंवार महाराष्ट्रात येईन. मी येथे येऊ नये, माझ्या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून गावागावात लोकांना लांगूलचालन दिले जात आहे.`
केसीआर पुढे म्हणाले की, मला नांदेडमध्ये दोनदा यावे लागले हे येथील लोकांचे प्रेम आहे. मला नांदेडमध्ये येऊ देऊ नये, यासाठी गावात पार्ट्या झाल्या. बकरे कापले गेले. माझ्या सभेसाठी लोकांना येऊ दिले जात नाही. खरेदी केंद्र उघडून शेतकऱ्याचे धान्याचा एक एक कण शासनाने खरेदी करावा. या मागण्या जर पूर्ण केल्या तर मी देवेंद्र फडणवीसांना सांगतो की, महाराष्ट्रात येणे बंद करीन. मला महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यासाठी ही कामे करा. जोपर्यंत ही कामे करणार नाही तोपर्यंत मी येत राहील. लोकांच्या हक्कांसाठी लढाई पुढे नेऊ. दलित, आदीवासी शतकांपासून त्रस्त आहे. त्यांचा त्रास कमी व्हायला हवा. तेलंगणातील आम्ही या वर्गातील प्रत्येकांना दहा लाख रुपये देतो. ते परत घेतही नाही. दलित बंधू ही योजना मी लागू केली आहे. महाराष्ट्रात ही योजना लागू करा.