जळगाव-‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतला, तर आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमच्या पाठी फोडल्या. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकूल जाणार नाही. परंतु राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. शिवसेनाप्रमुखांनी भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो, हे कधीच होणार नाही. मात्र काँग्रेससोबत युती करण्यास या एका अटीवर आम्ही तयार आहोत’, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यात मुख्यमंत्रिबदलाचे वारे वाहू लागल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटील यांनी हे विधान केल्याने त्यात भरच पडली आहे. भाजपच्या हालचालींना शिंदे गटाकडून भाजपला देण्यात आलेला हा सूचक इशारा आहे, असे समजण्यात येत आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद बदलाची शक्यता असलेले वातावरण आहे. हे वातावरण जाणूनबुजून तयार केले जात आहे, असाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यात काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे नाव आल्यापासून शिंदे गट बिथरला आहे, असे समजले जात आहे. अजित पवार त्यांचा गट घेऊन भाजपमध्ये येणार असतील, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे शिंदे-भाजपमध्ये काहीतरी बिनसतेय की काय, असे चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात गेल्यास राजीनामा तयार ठेवा, असेही शिंदे यांना भाजपकडून सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभती, मराठा नेता म्हणून छाप निर्माण करण्यात आलेले अपयश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभावी कामगिरी न करता येणे, लोकाभिमुख निर्णय घेत नसल्याच्या तक्रारी, वेदांत-खारघर दुर्घटना यासारख्या प्रकरणांत एकाकी पडल्याचे चित्र अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप 2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांची सुट्टी घेऊन अचानक आपल्या गावी गेले आहेत. कर्नाटकमधील निवडणुकीत भाजपचा प्रचार करायलाही ते गेले नाहीत. बारसू येथील रिफायनरीचा मुद्दा पेटला असताना मुख्यमंत्री गावी का गेले, याचे कुठलेही स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले नाही. शिंदे नाराज असल्यानेच गावी गेल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर त्यांच्या समर्थकांकडून लावली जात आहेत. त्याचे टायमिंगही महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा तीन महिन्यांत दोन वेळा नागपूर दौर्यावर येत असल्याने त्याचीही चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, सोंगट्या फिरवायच्या असतील, म्हणून गृहमंत्री नागपुरात येत असतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
… तर काँग्रेससोबत जाण्यास तयार शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक वक्तव्य
