मुंबई- पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली; तसेच तमाशाचा खेळ चालू देणार नाही,अशी धमकी दिल्याचा आरोप करत तमाशा कलावंतांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत याप्रकरणी सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
तमाशा कलावंत उषा काळे यांचे पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरुळी येथे त्रिमूर्ती लोकनाट्य सांस्कृतिक कला व प्रशिक्षण केंद्र आहे. २० जूनच्या मध्यरात्री पिंपरी-चिंचवडचे प्रभारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कला केंद्राला भेट दिली. यावेळी वैध परवाना दाखवूनही अमितेश कुमार यांनी व्यवस्थापकाला नोटीस बजावली व दंडाधिकाऱ्यांपुढे हजर होण्यास सांगितले. तसेच ‘यापुढे तमाशा व्यवसाय करायचा नाही, जर व्यवसाय सुरू ठेवला, तर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी पोलिस आयुक्तांनी दिल्याचा आरोप काळे यांनी केला.महाराष्ट्रात लोककलेचा वारसा पूर्वापार चालत आला असून पोलिसांच्या बेबंदशाहीमुळे तमाशा व्यावसायिकांवर गदा आली आहे. इतकेच नव्हे,तर तमाशा व्यवसाय बंद केल्यामुळे ९० कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईला काळे यांनी ॲड.शैलेश खरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकेवर न्या.रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला.त्यानुसार खंडपीठाने अवधी देत सुनावणी २२ जुलैपर्यंत तहकूब केली.