रायगड – खालापूर तालुक्यातील साजगावच्या डोंगरावर भरणारी आणि सलग १५ दिवस चालणारी बोंबल्या विठोबाची यात्रा काल सुरू झाली. या ठिकाणाला धाकटी पंढरी असेही संबोधले जाते. यंदाही या यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
संत तुकारामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत यात्रा भरत असल्याने भाविक मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत.संत तुकाराम महाराज घाटमाथ्यावरून मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी कोकणात येत असत. एकदा संत तुकाराम महाराज यात्रेत मिरची विकता-विकता आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले असताना यात्रेतील लोकांनी तुकाराम महाराजांच्या मिरच्या पैसे न देता घेऊन गेले.यामुळे दुखी झालेल्या तुकाराम महाराजांनी विठलाच्या नावाने बोंब मारली. तेव्हा साक्षात विठ्ठलाने याच ठिकाणी तुकारामांना दर्शन दिले. तुकारामांनी बोंब मारल्याचा आणि विठ्ठलाने त्यांना त्यांच्या मिरच्या दिल्याने या साजगावच्या यात्रेला ‘बोंबल्या विठोबा’ असे संबोधले जाते.
गेली अनेक शतके याठिकाणी यात्रा परंपरा सुरु आहे.साजगावच्या यात्रेत बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरतो.कोकणातील शेतकऱ्यांना चांगल्या जातीची जनावरे व्यापारी उपलब्ध करून देत असतात.यंदा यात्रेला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.रायगडमधूनच नव्हे तर पुणे,कल्याण,मुंबई,
महाड आदी भागातून लोक यात्रेला येत आहेत . याठिकाणी सुक्या मासळीचा बाजार भरतो.लोक वर्षभराची सुकी मासळी याच यात्रेत खरेदी करतात.