ढाका – बांगलादेशात गेले काही महिने हिंदूंविरोधी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यात मुस्लीम विद्यार्थ्यांनी अविचार केला. ढाका विद्यापीठाच्या कँटीनमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांनी जिवंत गाय आणली आणि गाय कापून ते मांस शिजवून खायला घालण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास गायीची हत्या करण्याची धमकीही दिली.
ढाका विद्यापीठातील मोधूज कँटीन हे उपहारगृह कित्येक वर्षे उत्तम पदार्थ देण्यासाठी प्रसिध्द आहे. मोधूदा नामक मालकामुळे विद्यार्थी उपहारगृहाला मोधूज कँटीन म्हणतात. या उपहारगृहात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ उपलब्ध असतात. मात्र मोधूदा हे हिंदू असल्याने येथे गोमांसाचे पदार्थ दिले जात नाहीत. सध्या बांगलादेशमध्ये हिंदू-मुस्लीम वाद उफाळला असल्याने मुस्लीम विद्यार्थ्यांनी मुद्दाम गाय आणून गोमांस खाण्याची मागणी करीत आंदोलन केले. या आंदोलनाचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हिंदू धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर हिंदूंकडून या आंदोलनाचा निषेध करणार्या पोस्टचा अक्षरशः वर्षाव झाला.
पंतप्रधानपदावरून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर शेख हसिना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तेव्हापासून
बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधी लाट उसळली आहे. हिंदूंवर हल्ले झाल्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. ढाका विद्यापीठात काल मुस्लीम विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन हे बांगलादेशीयांच्या हिंदूद्वेषाचे ताजे उदाहरण आहे. शिकण्याच्या वयात विद्यार्थी अशा तर्हेच्या धार्मिक आंदोलनात सहभागी होतात हे दुर्दैवी आहे.
गुरुग्राममध्ये दर मंगळवारी
मांस-मच्छी विकण्यास बंदी
बांगलादेशमध्ये मुस्लिमांकडून गोमांसासाठी आंदोलन होत असताना भारतात राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये शाकाहारी विरुध्द मांसाहारी असा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. गुरुग्रामच्या महानगरपालिकेने शहरात दर मंगळवारी चिकन, मटण, मासे आणि अंडी यांसह सर्व प्रकारच्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. मोईत्रा यांनी एका दुकानाबाहेर लावलेल्या सूचना फलकाचा फोटो एक्स पोस्टवर शेअर केला आहे. त्यावर मोईत्रा यांनी सवाल केला की, कोणत्या आधारावर पालिकेने हा मनाई आदेश जारी केला? अशा प्रकारे लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर सक्ती लादण्याने राज्य घटनेच्या कलम 21 आणि कलम 19 चे उल्लंघन करणे आहे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.