वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प यांच्याविरोधात दाखल गुन्हेगारी खटल्यात निकाल राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतरच देऊ, असे न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. या खटल्यात ट्रम्प यांना शिक्षा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमॉक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरीस आणि ट्रम्प यांच्यात लढत आहे. अमेरिकेतील निवडणूक विश्लेषकांनी हॅरीस याच विजयी होतील, असे भाकीत केले आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांना लाचखोरी प्रकरणात न्यूयॉर्क न्यायालयाने गेल्या मे महिन्यात दोषी ठरविले असून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. या खटल्यात ट्रम्प यांना कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. शुक्रवारी न्यूयॉर्क न्यायालयाचे न्यायाधीश जुआन मर्चेन यांनी या खटल्यात शिक्षेची सुनावणी निवडणुकीच्या निकालानंतर करण्यात येईल,असे सांगितल्याने ट्रम्प यांच्यावरील कारावासाचे अरिष्ट तूर्त टळले आहे.