नवी दिल्ली: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प-व्हान्स उद्घाटन समितीने त्यांना निमंत्रण दिले आहे. समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्री जयशंकर नवीन अमेरिकन प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. या प्रसंगी वॉशिंग्टनमध्ये उपस्थित असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय मान्यवरांशीदेखील ते संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी, ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांसह अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रणे पाठवली होती. मात्र, भारताला निमंत्रण न मिळाल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. आज परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती दिली की, ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. एस. जयशंकर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला एस. जयशंकर उपस्थित राहणार
