डोंबिवलीच्या भोपरमध्ये आढळला
आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी

डोंबिवली – शहरातील भोपर गावात आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी आढळून आला आहे.पक्षी निरीक्षक व आहार तज्‍ज्ञ डॉ. महेश पाटील यांना या देखण्या पक्ष्याचे दर्शन सकाळच्या वेळेस झाले असून त्यांनी त्याची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. रणगोजा हा पक्षी पाकिस्तान व भारताच्या पूर्वेला बिहार, दक्षिणेकडे, उत्तर आंध्र प्रदेश व मध्य महाराष्ट्रात आढळून येणारा पक्षी आहे.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत रोझ रिंग पॅराकिट या प्रजातीतील रंग परिवर्तन झालेला पिवळा पोपट आढळून आला होता. त्यानंतर गोपाळनगर रिंग रोड परिसरात पहाडी भागातील दिवाभीत घुबड, तर कल्याण रिंग रोड परिसरात दुर्मिळ शिंगाळा घुबड आढळून आले. यानंतर आता डोंबिवलीतील भोपर परिसरात रणगोजा पक्ष्याचे दर्शन पक्षिमित्रांना झाले. भोपर टेकडी परिसरात यापूर्वी पक्ष्यांची संख्या जास्त होती; परंतु आता मानवी अतिक्रमण झाल्याने जंगल परिसर नष्ट झाला असून या भागातील पक्ष्यांची संख्याही काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन या भागात नेहमीच पक्षिप्रेमींना होत असते.
डॉ.महेश पाटील हे नेहमीप्रमाणे भोपर परिसरात फेरफटका मारत असताना त्यांना रणगोजा हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. अतिशय चपळ असणाऱ्या या पक्ष्याचे दक्षिण आफ्रिका व सहारा वाळवंट हे मूळ निवासस्थान आहे.या ठिकाणाहून हा पक्षी तब्बल पाच हजार किमी अंतर पार करून डोंबिवलीमध्ये आला आहे. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणी पक्ष्याप्रमाणे आहे. हिवाळ्यातील दिवसांत हे पक्षी भारतात दाखल होत असतात. मार्च अखेरपर्यंत त्यांचा आपल्याकडे मुक्काम असतो.नंतर पुन्हा ते आपल्या मूळस्थानी जात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

Scroll to Top