नवी दिल्ली -भारताला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेऊन आर्थिक विकासाची दारे खुले करणारे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज निगम बोधघाट येथे करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना वाहनामधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी पार पडले.
डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. तिथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून ते निगमबोध घाटावर आणण्यात आले. काँग्रेस नेते आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या अंत्ययात्रेबरोबर चालत होते. राहुल गांधीही या अंत्ययात्रेत सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत चालत होते. यावेळी डॉ. मनमोहन सिंग अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, मनमोहन सिंग तेरा नाम रहेगा अशा घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या.
मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्यासह उपिंदर सिंग, दमन सिंग, आणि अमृत सिंग या त्यांच्या कन्या निगम घाटावर उपस्थित होत्या. मोठ्या कन्या उपिंदर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खा. प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखर हेदेखील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते. भूतानचे राजे दिगमे वांगचूक आणि मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल हेदेखील उपस्थित होते.