डॉक्टरांचा देशव्यापी संप राज्यात रुग्णसेवा कोलमडली

मुंबई – कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि डॉक्टरांच्या विविध संघटना या संपात सहभागी झाले होते. या संपाचा आरोग्यसेवेवर मोठा परिमाण झाला. अन्य ठिकाणी रुग्णांना उपचाराविना परत फिरावे लागले, तर अनेक रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
महिला डॉक्टरांसह सर्व डॉक्टरांना संरक्षण, जलद न्याय या मागणीसाठी देशभरातील सरकारी व खासगी डॉक्टर आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत अशा 24 तासांच्या संपावर गेले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या या संपाच्या आवाहनाला 17 संघटनांनी पाठिंबा दिला होता.
मुंबईतील जेजे, केईएम, नायर, कूपर, लोकमान्य टिळक या रुग्णालयातील डॉक्टरांचा आज पाचवा दिवस होता. आज या रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागही बंद होते. केवळ आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पुण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांसह 900 डॉक्टर संपावर गेले होते. पुण्यात बीजे मेडिकल रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया या पुढे ढकलण्यात आल्या. संभाजीनगरात 550 डॉक्टर संपात सहभागी झाले होते. त्यांनी क्रांती चौक येथे आंदोलन केले. या आंदोलनामुळे बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या 10,000 रुग्णांना फटका बसला. 26 शस्त्रक्रियाही होऊ शकल्या नाहीत. ठाणे-कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी या संपामध्ये सहभागी झाले. इथले डॉक्टर गेले काही दिवस संपावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज 2 हजारहून अधिक रुग्ण येतात. निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच ताण पडत आहे. रुग्णालयात नियमितपणे होणार्‍या शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात आल्या असून, रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड, अमरावती, बीड येथील डॉक्टरही या संपात सहभागी झाले होते. संभाजीनगरात निवासी व खासगी डॉक्टरांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडला. नागपुरात निवासी महिला डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून डॉक्टर बहिणींच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर कायदा करण्याची मागणी केली.
दिल्ली, बिहार, नागालँड, केरळ, झारखंड, गोवा, नागालँड, झारखंड या राज्यात डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. रुग्ण दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात आंदोलन झाले. दरम्यान, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला आहे.

सिंधुदुर्गात 24 ऑगस्टला काळ्या फिती
सिंधुदुर्ग येथील कणकवली जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर या संपात सहभागी झाले नव्हते. ते 24 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top