परळी -परळी शहरातील एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाने ठिय्या मांडून निवेदन दिले. संबंधित डॉक्टरला तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाच्या निषेधार्थ व संबंधित डॉक्टरच्या अटकेसाठी आज परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत पोलीस अधीक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल सायंकाळी परळी शहरातील एका दवाखान्यात २१ वर्षीय युवती तपासणीसाठी गेली होती. यावेळी वैद्यकीय तपासणीचे निमित्त साधून या डॉक्टरने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने निकराचा विरोध केल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेबाबत पीडितेने पोलिसांकडे फोनवरून तक्रार केली. या घटनेच्या निषेधार्थ आज परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.