न्यूयॉर्क- अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आपल्या पक्षाचे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मिनेसोटाचे गव्हर्नर ‘टिम वॉल्झ’ यांची निवड केली आहे.कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया व्यासपीठावर कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, “उपराष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून टिम वॉल्झ यांच्या नावाची घोषणा करताना मला अभिमान वाटतो आहे. गव्हर्नर, प्रशिक्षक, शिक्षक आणि अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा समावेश करणे ही आनंदाची बाब आहे.” तर आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना टिम म्हणाले की,”कमला हॅरिस यांच्यासोबत निवडणूक प्रचारात सहभागी होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च अभिमानाची बाब आहे.मी त्यांच्यासोबत आहे. राजकारणात काय काय करणे शक्य आहे याचा वस्तुपाठ कमला हॅरिस यांनी दाखवून दिला आहे.मला शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण होते.आपण नक्कीच जिंकू,” असे वॉल्झ म्हणाले.माजी सभापती, नॅन्सी पेलोसी यांनीही वॉल्झ यांच्या निवडीचे स्वागत केलं आहे.
टिम वॉल्झ ६० वर्षांचे आहेत. २०१८ मध्ये टिम वाल्झ यांची मिनेसोटाच्या गव्हर्नरपदी निवड झाली होती. त्यांनी १२ वर्षं अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे एक कणखर आणि लढाऊ सदस्य अशी त्यांची ओळख आहे.