फ्लोरिडा – अमेरिकेत काल येऊन गेलेल्या डेबी चक्रीवादळामुळे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर कोकेनचे खोके वाहून आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १० लाख डॉलर म्हणजे ९ कोटी रुपये आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने या कोकेनच्या खोक्यांची छायाचित्रेही प्रकाशित केली आहेत.
अमेरिकेला अती तीव्रतेच्या डेबी चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यावेळी २८८ किलोमिटर प्रतीतास या वेगाने वारे वाहिले. सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने समुद्रातही उंच लाटा उसळल्या. या लाटांबरोबर ही कोकेनची पाकिटे किनाऱ्यावर वाहून आली. तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी ७० पाऊंड वजन असलेले १२ खोके किनाऱ्यावर वाहून आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १० लाख डॉलर असेल. कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये असलेले हे खोके सकाळी नागरिकांना आढळले. त्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर हे कोकेन ताब्यात घेण्यात आले. फ्लोरिडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर नेहमीच अशी पाकिटे आढळून येत असतात.