बंगळुरू- आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आजच्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानवर 7 धावांनी विजय मिळविला. मॅक्सवेल आणि डुप्लीसी हे दोघे बंगळुरूच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. परंतु बोल्टने बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याला शुन्यावर पायचित करून बंगळुरूला पहिला धक्का दिला. पाठोपाठ त्याने शाहबाज अहमदला 2 धावांनी तंबूत पाठवले. परंतु नंतर मात्र डुप्लीसी आणि मॅक्सवेल यांची जोडी जमली. या दोघांनी 128 धावांची मोठी भागिदारी केली. मात्र डुप्लीसीस 62 धावांवर धावचित झाला. त्याने 8 चौकार 2 षटकार ठोकले. तर मॅक्सवेलला अश्विनने 77 धावांवर बाद केले. दिनेश कार्तिक 16 धावांवर बाद झाला. या तिघांच्या व्यतिरिक्त बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही. लॅमरोर 8, प्रभूदेसाई 0, हसरंगा 6, विली नाबाद 4, विजयकुमार 0, सिराज नाबाद 1 असे इतर फलंदाज झटपट बाद झाले. तरीही बंगळुरूने 20 षटकांत 189 धावा केल्या.
दरम्यान 190 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानला सिराजने पहिला धक्का दिला. त्याने राजस्थानचा स्टार फलंदाज जॉस बटलर यांचा शून्यावर त्रिफळा उडवला. पण सलामीवीर जैस्वाल आणि देवदत्त पडिकल या दोघांनी डाव सावरला. जैस्वालने 47 तर पडिकलने 52 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार सॅमसन याला फक्त 22 धावाच करता आल्या. तर पीच हिटर हेटमेअर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 3 वर धावचित झाला. ध्रुव जुरेल याने अखेरपर्यंत लढत दिली आणि नाबाद 34 धावा केल्या. तर अश्विन 12 आणि अब्दूल बस्तीत नाबाद 1 यांना मात्र अपयश आले आणि राजस्थानचा डाव 20 षटकांत 182 धावांत आटोपला. बंगळुरूने 7 धावांनी सामना जिकला.