नवी दिल्ली – डिजिटल सुरक्षेसाठी दक्षता आवश्यक असून त्यासाठी थांबा, विचार करा व मग कृती करा या तीन टप्प्यांचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत होते. देशाच्या ॲनिमेशन क्षेत्रातील प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.पंतप्रधान यावेळी म्हणाले की, डिजीटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे, अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत. या प्रकाराचा मुकाबला करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारे परस्पर सहकार्याने काम करत असून, त्यांच्यातील समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली आहे. सायबर फसवणुकीला बळी पडलेल्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत त्याबाबत माहिती पोहचवावी, जनजागृतीसाठी सेफ डिजीटल इंडिया या हॅशटॅगचा वापर करावा, अशा मोहिमांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर ॲनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते, त्यामुळेच भारतातील ॲनिमेशन स्टुडिओ, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील गेमिंग अवकाशही झपाट्याने विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. ॲनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या व्ही आर अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या या निमित्ताने जागतिक ॲनिमेशन दिवस साजरा होणार असून, देशाला जागतिक ॲनिमेशनचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा संकल्प करावा.