पालघर- जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान बोट जोरदार वारे आणि लाटांमुळे उलटली. यात एका ३६ वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर एकजण कसाबसा पोहत किनार्यावर सुखरूप पोहचला.
समुद्रात बुडालेल्या तरुणाचे नाव भूपेंद्र किशोर अंभिरे (३६) असे असून तो डहाणू गावात राहत होता. या दुर्घटनेत बचावलेल्या तरुणाचे नाव संजय प्रकाश पाटील (३६) असे आहे. भूपेंद्र आणि संजय हे दोघेजण मासेमारीसाठी लहान बोट घेऊन डहाणू समुद्रात गेले होते. समुद्रात काही अंतरावर गेल्यावर जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. या लाटांमुळे त्यांची बोट उलटली. दोघेही पोहत किनाऱ्याच्या दिशेने येऊन लागले. काही वेळाने संजय किनार्यावर पोहचला, पण भूपेंद्र मागे कुठेच दिसत नव्हता. या घटनेची माहिती कळताच तटरक्षक दलाच्या जवानांनी त्याचा समुद्रात शोध घेतला, पण सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. मृत भूपेंद्रच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
डहाणूच्या समुद्रात बोट उलटली! मासेमारी करणारा तरुण बुडाला
