ठाणे- ठाणे खाडी परिसरात गरुडासारखी चलाख ‘ब्राह्मणी घार’ आढळली आहे.दक्षिण भारतातून स्थलांतर करून ही घार ठाणे खाडी परिसरात आली आहे.
पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी याबाबत सांगितले की,हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. परंतु ब्राम्ह्मणी घार पावसाळ्यात या परिसरात येते. पावसाळा सुरू झाला की, ही घार केरळ-गोवा राज्यातून कोकणाच्या दिशेने येते. ही घार सर्वसाधारण घारीसारखी दिसत असली तरी ती आकाराने लहान असते. शरीराचा रंग तांबूस तर डोके आणि मानेचा रंग पांढरा असतो. काळ्या घारीची शेपटी दुभंगलेली असते.तर ब्राह्मणी घारीची शेपटी गोलाकार असते.ही घार खारफुटीच्या जंगलात झाडाच्या शेंड्यावर बसलेली दिसते.
तसेच पक्षी अभ्यासक मंदार बापट यांनी सांगितले की, खाडीवर भक्ष्याच्या शोधात स्थानिक घारी घिरट्या मारताना आढळतात,त्यामुळे ब्राह्मणी घार खाडीवर विहार करताना पटकन लक्षास येत नाही. खाडीमधील माशांना पकडण्यासाठी त्या पाण्यावर झेपावतात, त्याचवेळी त्यांना बघण्याची संधी पक्षीप्रेमींना मिळते. गरुडासारखीच तीक्ष्ण नजर असणारी ही घार पापणी लवते ना लवते तोच सावजाची शिकार करते. नदीकाठीदेखील या घारीचा वावर असतो.