ठाणे – आज ठाण्यात आगीची एक भयंकर घटना घडली. ठाणे आणि घोडबंदरला जोडणार्या रस्त्यावरील ओरियन बिजनेस पार्क इमारतीला भीषण आग लागून ती सिनेवंडर मॉलपर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होत्या.
माजिवड्याच्या नाक्यावर ओरियन बिजनेस पार्क आहे. त्याच्या बाजूला सिनेवंडर मॉल आहे. आज रात्री 9 च्या सुमारास ओरियन बिजनेस पार्कच्या चौथ्या मजल्यावर अचानक आग लागली आणि या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि बाजूच्या सिनेवंडर मॉल पर्यंत पसरली. या आगीच्या घटनेचे वृत्त समजताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. घोडबंदर रोड हा पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाने जोडणारा रोड असल्याने या रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र आगीचे स्वरूप पाहून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकले नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे समजते. या आगीत बिजनेस पार्क आणि मॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. मात्र जीवितहानीबाबत माहिती मिळू शकली नाही.
ठाण्यातील ओरियन बिजनेस पार्कला आग
