ठाणे – जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असताना ठाणे पालिकेच्या विटावा प्रभाग समिती कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याने स्लॅब धोकादायक बनला आहे. या गळतीमुळे भिंतीला ओल असल्याने विजेचा धक्का लागण्याचीही भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत.
पावसामुळे होत असलेल्या या गळतीचे पाणी भिंतीत मुरत असल्याने इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या कार्यालयाच्या स्लॅबवर मलबा पडला आहे. त्यामुळे पाणी वाहून न जाता तिथेच साचून राहत आहे. प्रामुख्याने पाणीपुरवठा व मालमत्ता कर विभागात ही पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याबाबत कर्मचार्यांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.