मुंबई – मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकांची चांगलीच दाणादण उडाली. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार आणि मध्यम पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, सांताक्रूझ, विलपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसरसह मुंबईतील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाला. परिणामी रस्ते वाहतूक मंदावली होती. सायनाच्या गांधी मार्केट परिसरात पावसाचे पाणी साचले होते. अंधेरीतील सब-वेमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबईपाठोपाठ ठाण्यामध्येदेखील पावसाने सकाळी हजेरी लावली. ठाण्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे ठाण्याकडून घोडबंदरकडे आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्य रेल्वेच्या लोकल अर्ध्या तासाने, तर पश्चिम रेल्वेच्या लोकल १० मिनिटे उशिरा धावत होत्या.
पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला. परिणामी या पुलावरील वाहतूक ठप्प झाली. एकतानगर भागात संध्याकाळपर्यंत सर्व परिस्थिती स्थिर होती. मात्र प्रशाससाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीतील सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अंबिका नदीला पूर आला. या नदीत अडकलेल्या टेम्पोतून ग्रामस्थांनी दोघांना बाहेर काढले. इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
ठाणे-पुण्यासह मुंबई व उपनगरात मुसळधार पावसामुळे दाणादाण
