ठाणे- सर्वसामान्य ठाणेकरांची जीवनरेखा समजला जाणारा टीएमटी अर्थात ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा सध्या आर्थिक संकटात दिसत आहे.टीएमटीकडे असलेली परिचलनापोटीची कोरोनापासूनची थकबाकी तब्बल ५२ कोटींवर गेली आहे.ही थकबाकी लवकर भरली नाही तर कंपनीमार्फत चालविण्यात येणार्या तब्बल २४० बसेस बंद ठेवण्याची नामुष्की ठाणे पालिका परिवहन प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.
सध्या टीएमटीच्या ३८० बसेस ठाणेकरांच्या सेवेत कार्यरत आहेत.यातील २४० बसेस या खासगी कंपनीच्या आहेत.या बसेससाठी चालक- वाहकही कंपनीच पुरवित असते.मात्र टीएमटीकडून कंपनीला परिचलनपोटी दिली जाणारी ५२ कोटींची रक्कम कोरोनापासून दिलेली नाही. ही थकबाकी देण्यासाठी परिवहन प्रशासनाने राज्य सरकारकडे ३८ कोटी अनुदानाची मागणी केली आहे.यासाठी शासनाकडून अध्यादेश काढला आहे. मात्र हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे प्रलंबित आहे. हे अनुदान लवकर मिळाले तरच ठाणे परिवहनची ही आर्थिक कोंडी फुटेल, अन्यथा हे आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.