मुंबई- निवडणूक यादी जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून आणि शरदचंद्र पवार गटाकडून एबी फॉर्म वाटप सुरु झाले आहे. ज्या जागांवर महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत अशा ठिकाणांच्या उमेदवारांना मविआच्या या दोन घटक पक्षांकडून आज एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी आणि कुडाळ-मालवण येथील विद्यमान आमदार वैभव नाईक यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. वैभव नाईक यांच्या प्रतिनिधीने त्यांचा एबी फॉर्म स्वीकारला.
तर शरद पवार गटाकडून मुंबईतून घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण मतदारसंघातून प्रशांत यादव, पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आले. या उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी तात्काळ कामाला लागता यावे, यासाठी पक्षाकडून तात्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी लढत दिसत आहे. या दोघांमधीलही जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे आता कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. पण असे असताना काही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर न करताच एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. काल अजित पवार गटाने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊ केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि ठाकरे गटाने देखील एबी फॉर्म वाटप केले.
ठाकरे-पवारांकडून यादीपूर्वीच फॉर्म वाटप
