मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. शरद पवार यांच्या पक्षनिधीच्या मागणीप्रमाणे ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. ती आयोगाने मंजूर
केली आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड केले. यावेळी त्यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. यावर ठाकरे गटाने
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा निकाल अजून आलेला नाही.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गटाला)देखील देणगी स्विकारण्याची परवानगी देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 29-बी आणि कलम 29 -सी नुसार ’सरकारी कंपनी’ व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने किंवा खासगी कंपनीने दिलेली देणगी आणि योगदान स्वइच्छेने स्वीकारू शकतात. हे अधिकृत असेल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निधी स्वीकारण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती.