नवी दिल्ली : इलॉन मस्क जेव्हापासून ट्विटरचे मालक झाले, तेव्हापासून ही मायक्रोब्लॉगिंग साइट कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा स्वतःजवळ घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल होत असताना, मागच्याच महिन्यात इलॉन मस्क यांनी २एफए हे सिक्युरिटी फिचर वापरणाऱ्यांसाठी ट्विटरची ब्ल्यू टिकचे सब्स्क्रिप्शन गरजेचे असल्याची घोषणा केली होती. त्याचा पार्श्वभूमीवर आता आजपासून म्हणजेच २० मार्चपासून ट्विटर सिक्युरिटी फीचर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. २एफए हे महत्वाचे सिक्युरिटी फिचर आजपासून बंद होणार आहे. आता हे सुरक्षा वैशिष्ट्य फक्त ब्लू टिक मार्क असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
२एफए हे सिक्युरिटी फिचर महत्वाचे आहे. कारण हे तुमच्या ट्विटर अकाउंटला हॅकर्सपासून वाचवते. कोणीही अनधिकृतरित्या तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे आता ब्लू टिक मार्कसाठी, वापरकर्त्यांना दरमहा ६५० रुपयेशुल्क भरावे लागेल. या दरम्यान, जर का २० मार्चपर्यंत तुम्ही तुमची सेटिंग अपडेट केली नाही तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही अजूनही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकता. मात्र जर ट्विटरने तुमचे २एफए बंद केले तर तुमचे अकाउंट यापुढे सुरक्षित राहणार नाही.