मनीला – उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार जवळपास ८५ लोकांचा या घटनेत मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ट्रॅमी वादळ गेल्या शुक्रवारी वायव्य फिलीपिन्समध्ये पोहोचले . या वादळात सुमारे ८५ लोकांचा मृत्यू आणि ४१ लोक बेपत्ता असल्याची माहिती फिलीपिन्स सरकारी एजन्सीने दिली. एजन्सीने म्हटले की ट्रॅमी वादळ या प्रदेशातील वर्षातील सर्वात घातक वादळ आहे. दुर्गम भागातून सादर झालेल्या अहवालात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी माध्यमांना सांगितले की, अद्याप आमचे बचाव कार्य पूर्ण झालेले नाही, पूरग्रस्त परिसर असल्यामुळे मदतीसाठी पोहचताना अडचण निर्माण होते आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या धोक्यांना तोंड देऊ शकणाऱ्या पूर नियंत्रण प्रकल्पावर काम सुरू करण्याची आमची योजना आहे.
फिलिपिन्स सरकारच्या तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मार्कोस यांनी सरकारी अंदाजकर्त्यांच्या अहवालावर चिंता करत म्हटले की यावर्षी फिलीपिन्समध्ये आलेले ही ११ वे वादळ असून दक्षिण चीन समुद्रातील उच्च-दाबाच्या वाऱ्यांनी मागे ढकलल्यामुळे पुढील आठवड्यात वादळ पुन्हा उलटून येऊ शकते. ट्रॅमी वादळ जर मागे हटले नाही तर आठवड्याच्या शेवटी व्हिएतनामला धडकण्याचा अंदाज होता.ट्रॅमी वादळा पासून सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, फिलीपिन्स सरकारने शुक्रवारी शाळा आणि कार्यालये बंद केली होती .