वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेच्या भावी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्यासोबत शाही डिनरची संधी लाभावी अशी अनेकांची इच्छा असेल. पण यासाठी १ ते २ दशलक्ष अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे. एवढा भरभक्कम पक्षनिधी देणाऱ्या धनिकांनाच ही सुवर्णसंधी मिळेल,असे वृत्त अमेरिकेतील एका अग्रगण्य दैनिकाने दिले आहे.
पुढील वर्षी १९ जानेवारी रोजी डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प यांचे हे शाही भोजन होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आदल्या रात्री होणाऱ्या या डीनरला अनन्यसाधारण महत्व आहे. जे धनिक पक्षनिधी देऊन या डीनरला उपस्थित राहतील त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे,असा दावा या वृत्तपत्राने केला आहे.