कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते टोल नाक्यावर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरवस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सद्यपरिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे अशी परिस्थिती आहे. रस्त्याचे काम वेळेत होत नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पुणे, सातारा, कराड आणि किणी या चारही टोलनाक्यावर आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली.
शनिवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्ते टोलनाक्यावर जमा होतील. कोणतेही ट्रॅफिक न थांबवता हे आंदोलन केले जाईल. आम्ही वाहनांकडून टोल घेऊ देणार नाही. ज्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, त्या रस्त्याचा भुर्दंड प्रवाशांनी का द्यावा, असा आमचा सवाल आहे. सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे आदी बडे नेते सहभागी होणार आहेत.