पुणे
महिनाभरापूर्वी टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. पण आता त्याच टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि नारायणगावातील शेतकऱ्यांनी आज टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले.
२५०० रुपये दर असलेल्या टोमॅटोचा क्रेट आता ७० रुपये इतका झाला आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातील शेतकरी सुखदेव बारवकर यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले.
कांदा आणि टोमॅटो या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार समस्यांचा सामना करावा लागतो. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने त्वरित टोमॅटोची आयात केली होती. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील घसरण थांबली. आता टोमॅटोला भाव मिळत नसल्याने सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नारायणगावाच्या बाजार समितीमध्येही टोमॅटोचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाही दिल्या.