वॉशिंग्टन – अमेरिकन ईव्ही उत्पादक टेस्ला भारतात येणार होती. मात्र इलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अवजड उद्योग मंत्रालय, वित्त, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाशी कोणताही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे टेस्ला भारतात येण्याच्या आशा आता कमी झाल्या आहेत.
टेस्लाने सरकारकडे संपूर्ण असेंबल्ड वाहनांवरील आयात शुल्क ४० टक्के करा, इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क माफ करावा अशी मागणी केली होती. त्यावर टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले तर आयातीवरील सूट देण्याचा विचार केला जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. टेस्लाचा भारतात प्रकल्प उभारण्यासाठी इलॉन मस्क या वर्षी एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर येणार होते. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र, मस्क यांनी आपली ही भेट रद्द केली होती.
दुसरीकडे, गेल्या दोन तिमाहीत कंपनीला जागतिक बाजारात मागणी पूर्ण करता आलेली नाही. जागतिक बाजारपेठेत चिनी कंपन्यांनी टेस्लाला तगडी स्पर्धा दिली आहे. मस्क यांनी एप्रिलमध्ये मोठ्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. अनेक वर्षभराच्या प्रयत्नांनंतर तयार करण्यात आलेल्या सायबर ट्रकची निर्मिती संथ गतीने होत आहे. कंपनीकडे भारतात गुंतवणुकीसाठी भांडवल समस्या आहेत, याची माहिती सरकारला मिळाल्याने याबाबत बोलणी झालेली नाही. सरकारशी बोलणी पुढे सरकू शकली नसल्याने टेस्ला भारतात येण्याची शक्यता कमी झाली आहे.