टायर कंपनीत भीषण आग पाच जण गंभीर जखमी

पालघर- जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वडवली गावात एका टायर कंपनीतील प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल बुधवारी सायंकाळी घडली. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
वाडा तालुक्यातील वडवली गावाजवळ कुडूस औद्योगिक वसाहतीत एक टायर बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीच्या कारखान्यातील दोन बॉयलरमध्ये काल सायंकाळी ६ वाजल्यानंतर तेलावर प्रक्रिया केली जात होती. हे काम सुरू असताना अचानक दाब वाढल्याने एका बॉयलरचा दूरवरचा पाइप वेगळा झाला, त्यामुळे स्फोट होऊन आग लागली. असे पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. या दुर्घटनेतील जखमींची नावे – तुफान कलसिम डामोर (३०), रोशनी प्रवीण परमार (२६), मूल प्रेमा वासर (२७), काजल परमार (३ ) आणि आकाश प्रेम मासार (१८ महिने) अशी आहेत. हे सर्व जखमी मध्य प्रदेशातील झाबुआ येथील रहिवासी आहेत..
जखमींपैकी काही जण कारखान्याच्या शेजारील घरांत राहत होते. यातील दोघेजण त्याच कंपनीत काम करत होते.जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन मुलांसह चौघांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले. काही तासानंतर अग्नीशमन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top