मुंबई – टाटा पॉवर या कंपनीतील नोकरी सोडणे कर्मचाऱ्यांसाठी महागात पडत आहे. नोकरी सोडतांना कार्यालयीन कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप ६५ हजार रुपयात खरेदी करण्याची सक्ती त्यांना करण्यात येत आहे. एका माजी कर्मचाऱ्याने ही बाब निर्दशनास आणून दिली आहे.
टाटा पॉवरमधील नोकरी सोडणाऱ्या एका कर्मचाऱ्याने समाजमाध्यमावर नाव उघड न करता ही पोस्ट टाकली आहे. त्याने म्हटले आहे की, मी साधारण १ वर्ष २ महिने टाटा पॉवरमध्ये नोकरी केली. ही नोकरी सोडताना कंपनीने मला ऑफीसमध्ये वापरत असलेला लॅपटॉप खरेदी करण्याची सक्ती केली. या लॅपटॉपसाठी त्यांनी ६५ हजार इतकी किंमत निर्धारित केली आहे. हा लॅपटॉप खरेदी करण्यास मी नकार दिल्यावर त्यांनी मला अनुभव प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. कार्यालयीन कामांसाठी वापरण्यात आलेला हा लॅपटॉप नंतर उपयोगात येत नाही. प्रत्येकाकडे घरी लॅपटॉप असतोच त्यामुळे ही सक्ती अन्यायी आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








