मुंबई- अनेक क्षेत्रात अग्रणी टाटा समूह आता आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात टाटा समूह ५०० कोटी रुपये गुंतवणार आहे.
विशेष म्हणजे, टाटा समूहाचे मुंबईत टाटा मेमोरियल हे स्वतःचे कर्करोग रुग्णालय आहे. भारतातील प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये या रुग्णालयाचा समावेश होतो. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही या रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्ण येतात. आता टाटा समूहाने या आरोग्यसेवेचा विस्तार करायचा निर्णय घेतला असून यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गुंतवणूक केली जाणार आहे. हे रुग्णालय १९४६ मध्ये बांधण्यात आले आहे. या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात टाटा समूह ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात सुधारणा होण्यास मदत होईल.
५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे टाटा समूह रुग्णालयाचा सर्वात मोठा आर्थिक भागीदार बनणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष होतील. ते १ ऑक्टोबर २०२५ पासून दीपक पारेख यांची जागा घेतील. टाटा समूहाला रुग्णालयाच्या विद्यमान १४ सदस्यीय विश्वस्त मंडळात त्यांचे तीन प्रतिनिधी नियुक्त करण्याचाही अधिकार मिळेल. टाटा समूहाच्या गुंतवणुकीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयाच्या नावात टाटा हा शब्द जोडला जाऊ शकतो.