शिरूर – तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा येथील नैसर्गिक देण लाभलेल्या भीमा नदीपात्रातील रांजणखळग्यांकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीचेदेखील दुर्लक्ष झाले आहे.सध्या हे आकर्षक रांजणखळगे भग्नावस्थेत पडले असून, त्यांचे अस्तित्व लोप पावण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
भीमा नदीपात्रात असलेले हे टाकळी भीमा येथील रांजणखळगे पर्यटनस्थळ असून येथे श्रीराम मंदिर असून त्याला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळालेला आहे. या रांजणखळग्यांमधील पाणी हे खारे असून, बाहेरील पाणी गोड लागते. त्यातील पाणीसाठा बाराही महिने दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून या स्थळांकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रांजणखळग्यांत कचरा साचू लागला आहे.ते माती, दगडाच्या राड्यारोड्याने बुजू लागले आहे.झाडेझुडपे वाढू लागली आहेत.
नदीपात्रात जाण्यासाठी चांगला रस्ता राहिलेला नाही.याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीसुविधा नाहीत,अशी एकंदरीत परिस्थिती झाली आहे.