वॉशिंग्टन – अमेरिकेत गरुड पक्ष्याला सामर्थ्य आणि ताकदीचे प्रतीक मानले जाते. या पक्ष्याला मिळणारा हा मान आता अधिकृत झाला आहे. बाल्ड इगल किंवा टकल्या गरुड पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
टकल्या गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यासाठीचे विधेयक कॉंग्रेसने अध्यक्षांकडे पाठवले होते. या विधेयकावर तत्कालिन अध्यक्ष जो बायडेन यांनी स्वाक्षरी केली आहे. पांढरे डोके, पिवळी चोच आणि तपकिरी शरीर असलेल्या टकल्या गरुडाचे चित्र १७८२ पासून अमेरिकेच्या अधिकृत शिक्क्यावर आढळते. अधिकृत शिक्क्याचे मानचित्र निश्चित करण्यात आले, तेव्हापासून ते या शिक्क्यावर आहे. सरकारी कागदपत्रांसह अध्यक्षांच्या ध्वजापासून लष्करी चिन्ह आणि अमेरिकेच्या चलनावरही हा पक्षी आहे. अमेरिकेतील बहुतेकांना या पक्ष्याची माहिती आहे. मात्र या गरुडाला राष्ट्रीय पक्षी म्हणून दर्जा दिला गेला नव्हता. आता या गरुडाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.