नवी दिल्ली –
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने शुक्रवारी आयडीबीआय बँकेने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली. हे प्रकरण एस्सेल ग्रुप कंपनीला (सिटी नेटवर्क्स) झी एंटरटेनमेंटने दिलेल्या हमीशी संबंधित आहे. खंडपीठाचे सदस्य किशोर वेमुलापल्ली आणि तांत्रिक सदस्य प्रभात कुमार यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
आयडीबीआय (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) बँकेने डिसेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटकडून १४९ कोटी रुपयांच्या कर्जाच्या दाव्यासाठी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये आयडीबीआय बँकेने झी विरुद्ध ८३ कोटी रुपयांच्या कर्जासाठी अशीच याचिका दाखल केली होती. तथापि, झी एंटरटेनमेंटने बँकेशी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यापूर्वी राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाकडून दिवाळखोरीच्या कार्यवाहीवर स्थगिती मिळवली. न्यायाधिकरणाच्या सुनावणीत, झी एंटरटेनमेंटचे वकील झाल अंध्यारुजिना यांनी की, त्यांनी संपूर्ण कर्जाची रक्कम भरण्याची हमी दिलीच नव्हती. त्यांची हमी केवळ ५० कोटी रुपयांवरील क्रेडिट सुविधेसाठी आहे. ही एक संधी पाहून केलेली याचिका आहे.