रांची – झारखंडचे विद्यमान शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे
त्यांना तातडीने एअरलिफ्ट करत चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, आमचा वाघ जगरनाथ राहिला नाही. आज झारखंडने आपला महान आंदोलनकर्ता, एक लढवय्या, कष्टाळू आणि लोकप्रिय नेता गमावला. आदरणीय जगरनाथ महतोजी यांचे चेन्नई येथे उपचारादरम्यान निधन झाले. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला या दु:खाच्या वेळी सहनशक्ती देवो.गेल्या महिन्यात १४ मार्च रोजी त्यांना चेन्नईला उपचारासाठी आणले होते. मात्र २२ दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.