ज्येष्ठ समाजवादी रवींद्र वैद्य यांचे९० व्या वर्षी जव्हार येथे देहावसान

मुंबई

ज्येष्ठ समाजवादी नेते रवींद्र वैद्य यांचे पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, सुपूत्र संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी जव्हार येथे थोर स्वातंत्र्यसेनानी काकी वैद्य आणि दत्तात्रय वैद्य यांच्या पोटी जन्मलेले रवींद्र वैद्य यांनी जुनी अकरावी उत्तीर्ण झाल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काही काळ नोकरी केली. आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी काम करावे, हा ध्यास घेतलेल्या रवींद्र वैद्य यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे कार्य सुरु केले. साथी एस एम जोशी, नानासाहेब गोरे, प्रा. मधू दंडवते आदी नेत्यांच्या संपर्कात आले. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला . रवींद्र वैद्य यांनी गोवा व दमण मुक्ती आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा ते सहभागी झाले. प्रज्ञा समाजवादी पक्षाचे कार्य करतांना अंबरनाथ येथील साथी वसंतराव त्रिवेदी हेही त्यांचे सहकारी होते. त्यांच्या साप्ताहिक आहुति बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाबरोबरच मराठी पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता. आदिवासी भागात नाथादादा किंवा भाई वैद्य या नांवाने ते ओळखले जात. रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा अट्टाहास होता. मृणाल गोरे यांच्या समवेत त्यांचे कौटुंबिक संबंध होते. इतकेच नव्हे तर रवींद्र वैद्य यांनी उभारलेल्या आंदोलनात मृणालताई आवर्जून उपस्थित रहात. १९९७ साली त्यांच्या पत्नी सौ. नीला यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र वैद्य यांची प्रकृती बरी रहात नव्हती. यातूनही गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. काल गुरुवार, २५ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top