मुंबई- देशाच्या संरक्षणसज्जतेमध्ये अत्यंत मोलाची भर घालणाऱ्या दोन अत्याधुनिक युध्दनौका आणि एका पाणबुडीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. याप्रसंगी मोदी यांनी देशाच्या संरक्षणसज्जतेतील स्वयंपूर्णतेचे गौरवशाली चित्र लोकांसमोर मांडले. त्यानंतर नौदलाच्या आंग्रे सभागृहात मोदींनी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की ज्यांनी आपल्याला मत दिले नाही त्यांना जिंका, म्हणजे विरोधकच शिल्लक राहणार नाहीत.
पंतप्रधान मोदी यांनी आमदारांना मार्गदर्शन करीत पुढची वाटचाल कशी करायची याचा सल्ला दिला. ते आपल्या भाषणात म्हणाले की, सत्ता योग्यप्रकारे राबवा. जनतेची कामे शक्य तेवढ्या लवकर कशी करता येतील याचा विचार करा. विरोधी पक्षातील नेत्यांनी जनतेच्या हिताची कामे आणली तर तीदेखील आवर्जून करा. त्यांच्याशी नम्रपणाने बोला. सरकारी अधिकाऱ्यांशी नम्रपणाने बोला. तरच ते तुमची कामे करतील. सार्वजनिक जीवनात वावरताना कोणाशीही उद्धटपणाने वागू नका. तुम्हाला सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर बोलताना संयम ठेवा आणि नम्रतेने वागा. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांनी आपल्याला मते दिली नाहीत त्यांचा राग करू नका. त्यांना जिंका. आपलेसे करा. म्हणजे तुम्हाला विरोधकच राहाणार नाही. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. त्यांच्या सोबत वेळ घालवा असा उपदेश मोदी यांनी केला.
तत्पुर्वी, नौदलाच्या ताफ्यात दोन युध्दनौका आणि एका पाणबुडीचा समावेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, युद्धनौका आणि पाणबुडींची भारतात निर्मिती झाली ही अभिमानास्पद बाब आहे. भारत विकासाच्या दृष्टीने कार्य करणारा देश आहे.समुद्र किनाऱ्यालगतच्या देशांसह संबंधांची चर्चा झाली तेव्हा संपूर्ण परिसराची एकत्र प्रगती ही दृष्टी ठेवली.आर्थिक प्रगतीसाठी व्यापाराचे मार्ग सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. इथे मादक द्रव्य व अतिरेकी कारवायांना स्थान मिळता कामा नये. हिंद महासागरात भारताची उपस्थिती ही जगात सुरक्षिततेची भावना निर्माण करते.गेल्या दहा वर्षांत दिन्ही सैन्य दलांनी आत्मनिर्भरता आणली.एक जहाज बनवण्यासाठी दोन हजार कामगार लागत असतील तर त्याचे सुटे भाग बनवण्यात बारा हजार कामगारांना नोकऱ्या मिळतील. 2014 साली सीफेअररची संख्या एक लाखहून कमी होती. ती आता तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. व्यापार वाढेल तशी आणखी जहाजांची गरज भासेल. त्यामुळे
रोजगार वाढेल.
दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे काम सुरू झाल्यामुळे तिथेही नव्या रोजगार संधी उपलब्ध होतील.
आमदारांना संबोधित केल्यानंतर सायंकाळी खारघरमधीलआशिया खंडातील इस्कॉनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या भव्य मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले. याप्रसंगी बोलताना मोदी यांनी देशाच्या प्रगतीमध्ये अध्यात्माचे महत्व अधोरेखित केले. मोदी म्हणाले की, या नव्या श्रीकृष्ण मंदिरात नव्या पिढीच्या आवडीनुसार रामायण, महाभारतातील कथा सांगितल्या आहेत. वृंदावनासारखा बगीचा आहे.या पुण्य कार्यासाठी इस्कॉन आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. भारत देश ही अद्भुत भूमी आहे.हा देश समजून घ्यायचा तर अध्यात्माचा अभ्यास करायला हवा.कृष्ण सर्किटचा विकास होत आहे.इस्कॉनने आपल्या भक्तांना किमान पाच तीर्थक्षेत्रांना पाठवावे. आपल्या सानिध्यात तरुण पिढी देशसेवेचे कार्य करेल. आपल्याला संवेदनशील समाजाची निर्मिती करायची आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .
ज्यांनी मत दिले नाही त्यांना जिंका! म्हणजे विरोधकच राहाणार नाहीत! पंतप्रधानांचा आमदारांना वागणुकीचा मंत्र
