आळंदी – येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून हरिनाम गजरात माऊलींच्या पालखीचे 11 जूनला पंढरीस जाण्यास प्रस्थान होणार आहे. सोहळ्यास राज्य परिसरातून लाखो भाविक, नागरिक आळंदीत हरिनाम गजरात दिंड्या दिंड्यातून येतात. यावर्षी गेल्या दोन वर्षातील सोहळ्याचे तुलनेत भाविकांची गर्दी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 12 जूनला श्रींची पालखी गांधी वाड्यातील पाहुणचार घेऊन पालखी सोहळा पुण्यनगरीकडे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल असे देवस्थानच्या वतीने व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 व 15 जूनला सासवड मुक्काम , 16 जूनला जेजुरी कडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरी मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम, 23 ला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर , 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलै ला गोपालकाळा होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनात सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. वारकरी भाविक यांना सोहळ्यात गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.