कोल्हापूर – जोतिबा डोंगर येथे प्रसादाच्या कुंद्यामध्ये काल ब्लेड आढळल्याने खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका दुकानातून हा प्रसाद खरेदी करण्यात आला होता. यापूर्वीही असा प्रकार उघडकीस आला होता. मात्र, प्रसाद व पेढे व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अन्न औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांवर करवाईची मागणी जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. कोणतीही कारवाई झाली नाही तर पेढेविक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.
सुनील नवाळे म्हणाले की, मला प्रसादाच्या कुंद्यामध्ये काल ब्लेडची पात आढळली. मी याबाबत दुकानदाराला विचारणा केली, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जोतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त पेढे विकले जात आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. उत्पादक, घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यासोबत अन्न प्रशासनाचे काही संबंध आहेत का ? पेढेविक्रेते, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू. प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे.