कोल्हापूर- श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील जोतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा १२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या जोतिबा चैत्र यात्रेला उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पन्हाळाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.
या पहिल्या नियोजन आढावा बैठकीत प्रांताधिकारी शिंगटे यांनी सांगितले की, यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मागील यात्रेतील त्रुटी दूर करून येणार्या भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केमिकलयुक्त गुलाल, भेसळयुक्त पेढे यांची तपासणी करण्याच्या सूचना पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिल्या. या बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून तहसीलदार शिंदे यांनी याबाबतच्या सूचना दिल्या. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील आणि कोडोली पोलीस ठाण्याचे नामदेव दांडगेकर आदी जण उपस्थित होते.
जोतिबाची यात्रा १२ एप्रिलला भाविकांची विक्रमी गर्दी होणार
