सुरत – जैन बांधवांमध्ये धार्मिक महत्वाच्या चातुर्मास सणासाठी जोरदार तयार सुरू आहे.गुजरातच्या सुरतमधील आचार्य महाश्रमण प्रवास व्यवस्था कमिटी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या स्वागतासाठी तयारी करीत आहे. २० जुलै पासून चातुर्मास सुरू होत आहे .आचार्य श्री महाश्रमणजी तेरापंथी जैन धर्मसंघाचे सर्वोच मुनी आहेत. धर्मसंघाच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर ते सुरतमध्ये येणार आहेत. आचार्य महाश्रमणजी यांनी धर्मदीक्षा घेतली त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या पन्नास वर्षांच्या कालावधीत आचार्य श्री महाश्रमणजी यांनी ५६ हजार किलोमीटरहून जास्त पायी प्रवास केला आहे.त्यांचे सुरतमध्ये होणारे आगमन ऐतिहासिक मानले जात आहे. जैन बांधव त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत.सुरतच्या वेसू परिसरातील भगवान महावीर विद्यापिठात आचार्य श्री महाश्रमणजी यांचे १५ जुलै ते १५ नोव्हेंबरपर्यंत वास्तव्य असणार आहे.या कालावधीत बृहद मंगल पथ वाचन, धार्मिक व्याख्याने आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापिठाच्या शेजारी प्रशस्त असा सन्याम विहार उभारण्यात आला आहे.८० हजार चौरस फुटांचे विशाल मंडप याठिकाणी उभारण्यात आले आहेत. एका वेळी २५ भाविकांना सामावून घेण्याची या मंडपाची क्षमता आहे.